Image Source:(Internet)
मुंबई : राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत (Ladki Bahin scheme) मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून, पात्रता नसतानाही हजारो जणांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती विधिमंडळात उघड झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या माहितीनुसार, अनेक शासकीय महिला कर्मचारी तसेच काही पुरुष लाभार्थ्यांच्या खात्यातही योजनेची रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे शासनाच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भार पडला असून, योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि पडताळणी प्रक्रियेतील हलगर्जीपणा चर्चेचा विषय ठरला आहे. गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर शासनाने तातडीने कारवाई सुरू करत अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते बंद केले आहेत. तसेच नियमबाह्यपणे वितरित झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांवरही शासनाने लक्ष केंद्रित केले असून अशा खात्यांमधील लाभ रोखण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात गैरमार्गाने लाभ घेणाऱ्यांसह पडताळणी प्रक्रियेत निष्काळजीपणा करणाऱ्यांविरोधात पुढे कोणती कारवाई होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.