
Image Source:(Internet)
नागपूर : नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एका ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या पर्समधून 20 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी झाल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत एका महिला आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून 7 लाख 6 हजार 754 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून तिचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोसले पॅराडाईज परिसरातील 67 वर्षीय महिला नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढत होत्या. याचवेळी गर्दीचा फायदा घेत एका महिलेने त्यांच्या खांद्यावरील पर्समधील दुसरे पर्स लंपास केले. त्या पर्समध्ये लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड होती.
घटनेची तक्रार प्राप्त होताच जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने अजनी रेल्वे स्थानकासह नागपूर शहरातील विविध भागांतील 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
तपासादरम्यान चोरीनंतर स्थानक परिसरातून बाहेर पडणारी एक संशयित महिला सीसीटीव्हीत आढळून आली. त्यानंतर तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
पोलिसांनी रामेश्वरी परिसरातील रामटेकेनगर येथे राहणाऱ्या 25 वर्षीय पूजा अर्जुन उफाडे हिला 15 जून रोजी अटक केली. चौकशीत तिने मुस्कान आणि सुरेखा नावाच्या दोन महिलांसोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपी पूजा हिच्याकडून तिच्या वाट्याला आलेले 7 लाख 6 हजार 754 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित चोरीचा माल आणि फरार आरोपींचा शोध सुरू असून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सीसीटीव्ही नेटवर्क आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने लाखो रुपयांच्या चोरीचा उलगडा करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोकड यांची विशेष काळजी घेण्याचे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.