
Image Source:(Internet)
मुंबई : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनने राज्यात जोरदार हजेरी लावली असून मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील पाणीटंचाईची समस्या कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकत असून महाराष्ट्रातील बहुतांश भाग व्यापण्याच्या मार्गावर आहेत. सध्या मान्सूनची प्रगती वेगाने सुरू असून पुढील दोन दिवस वातावरणीय परिस्थिती त्यासाठी अनुकूल राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईतील अनेक उपनगरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची तीव्रता वाढली आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव आणि दहिसर परिसरात जोरदार सरी कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील तीन तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातही पावसाची सक्रियता वाढली असून हवामान खात्याने यलो अलर्ट घोषित केला आहे. गेल्या २४ तासांत तापमानात लक्षणीय घट झाली असून अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.