
Image Source:(Internet)
कामठी : नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात सोमवारी एका आक्रमक कुत्र्याने नागरिकांवर हल्ल्यांची मालिका घडवून आणत तब्बल १३ जणांना जखमी केले. जखमींमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान पांढऱ्या रंगाचा हा कुत्रा शहरातील विविध भागांत फिरत होता. अचानक आक्रमक झालेल्या या कुत्र्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर झडप घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेकांना हात, पाय तसेच शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या.
घटनेनंतर जखमींना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका मागोमाग एक हल्ले होत असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यानंतर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी कुत्र्याचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मोंढा परिसरात रात्री उशिरा त्या कुत्र्याला पकडण्यात यश आले. त्यामुळे नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला.
सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून आरोग्य विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले.