गद्दार खासदारांच्या मतदारसंघात जाऊन माफी मागणार; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

    22-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांमुळे निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. पक्षाशी बेईमानी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात स्वतः जाऊन जनतेची माफी मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील जाहीर सभेत बोलताना ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांच्या अथक परिश्रमांमुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे हे खासदार निवडून आले. मात्र, आता ते पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असतील तर त्याची जबाबदारी जनतेसमोर स्वीकारण्यासाठी आपण संबंधित मतदारसंघात जाणार आहोत.

यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. तीन दशकं काँग्रेसविरोधात राजकारण केले, मात्र काँग्रेसने कधी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपने मात्र पक्षफोडीचे राजकारण करून विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.

कोल्हापूरमधील सभेत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांचा ‘शिवसेना प्रमुख’ असा उल्लेख केल्याबद्दलही ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख ही ओळख फक्त बाळासाहेब ठाकरे यांचीच असून ती दुसऱ्या कोणालाही लागू होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून उद्धव ठाकरेंच्या या घोषणेमुळे आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.