ठाकरे गटातील सहा खासदारांचा आज शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता; 'ऑपरेशन टायगर'ला वेग

    22-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले ठाकरे गटाचे सहा खासदार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.

ठाकरे गटाच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिंदेसेनेत विलीनीकरणाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी १९ जून रोजी हा प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही खासदारांची भूमिका स्पष्ट नसल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता या सर्व खासदारांकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, संबंधित सहा खासदारांनी गेल्या आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील, धनुष्यबाण चिन्ह असलेल्या शिवसेनेत विलीनीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. या निर्णयाबाबतचा खुलासा आज पत्रकार परिषदेत केला जाऊ शकतो.

दरम्यान, पक्षांतर बंदी कायद्यानुसार कोणत्याही पक्षातील किमान दोन-तृतीयांश सदस्यांनी एकत्रितपणे वेगळी भूमिका घेतल्यास त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळू शकते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार असल्याने दोन-तृतीयांश संख्येसाठी किमान सहा खासदारांची आवश्यकता होती. सुरुवातीला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत संभ्रम होता. मात्र त्यांनीही शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय स्पष्ट केल्याने आवश्यक संख्या पूर्ण झाल्याचे मानले जात आहे.

यामुळे बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता कमी झाल्याची चर्चा आहे. तथापि, या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची अधिकृत मान्यता मिळणे आवश्यक असून त्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे आजच्या घडामोडींवर राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.