
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनवण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे. नव्या व्यवस्थेनुसार लाभार्थ्यांना आता संपूर्ण रेशन एकाच दुकानातून घेण्याची सक्ती राहणार नाही. ग्राहक आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या रेशन दुकानांतून गहू, तांदूळ किंवा अन्य धान्य घेऊ शकणार आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे रेशन दुकानांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांचा वेळही वाचणार आहे. अनेकदा बायोमेट्रिक पडताळणीतील अडचणी किंवा धान्य उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत होते. मात्र आता पर्यायी दुकानातून धान्य घेण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा One Nation One Ration Card (ONORC) योजनेअंतर्गत अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. या प्रणालीमुळे लाभार्थी आपल्या हक्काच्या धान्याचा काही हिस्सा एका ठिकाणाहून तर उर्वरित हिस्सा दुसऱ्या रेशन दुकानातून घेऊ शकतात.
ही व्यवस्था बँकेच्या एटीएमसारखी कार्य करणार असून देशातील कोणत्याही भागात असलेला रेशन कार्डधारक आधार कार्ड आणि बायोमेट्रिक पडताळणीच्या आधारे आपल्या वाट्याचे धान्य मिळवू शकणार आहे.
या सुविधेचा सर्वाधिक फायदा स्थलांतरित मजूर, कामगार आणि रोजगारासाठी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. आता रेशन मिळवण्यासाठी मूळ गावात जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतही अधिक लवचिकता आणि पारदर्शकता येणार आहे.