विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; नागपुरातून भाजपचे राजीव पोतदारा विजयी

    22-Jun-2026
Total Views |
17 पैकी 16 जागांवर महायुतीचा झेंडा, राज्यभर वर्चस्व कायम

Image Source:(Internet)

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. राज्यातील 17 जागांपैकी तब्बल 16 जागांवर विजय मिळवत महायुतीने दणदणीत यश संपादन केले. नागपूर मतदारसंघातून भाजपचे राजीव पोतदार यांनी विजय मिळवत विदर्भातील भाजपचे बालेकिल्ले अधिक भक्कम असल्याचे दाखवून दिले.

18 जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीपूर्वीच सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये ठाण्याचे रवींद्र फाटक, यवतमाळचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गचे अनिकेत तटकरे, पुण्याचे विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगरचे प्राजक्त तनपुरे यांचा समावेश होता.

मतमोजणीनंतर छत्रपती संभाजीनगर-जालना येथून सुहास शिरसाट, भंडारा-गोंदिया येथून अविनाश ब्राह्मणकर, सांगली-सातारा येथून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, धाराशिव-लातूर-बीडमधून बसवराज पाटील, नागपूरमधून राजीव पोतदार, जळगावमधून नंदकिशोर महाजन, अमरावतीमधून प्रवीण पोटे आणि नांदेडमधून अमर राजूरकर यांनी विजय मिळवला. परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी ठरले.

या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत नाशिकमध्ये पाहायला मिळाली. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना धक्का देत भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी बाजी मारली. त्यामुळे राज्यभरातील विजयाच्या मालिकेत महायुतीला केवळ एका जागेवर पराभव स्वीकारावा लागला.

निकालानुसार भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या, तर शिवसेनेच्या खात्यात 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात 2 जागा गेल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. विशेषतः विदर्भातील मतदारसंघांमध्ये भाजपने मजबूत कामगिरी करत महायुतीच्या विजयात निर्णायक योगदान दिले.