नागपुरात प्रेयसीच्या महागड्या हौशींसाठी अल्पवयीनाने फोडले घर; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

    20-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : प्रेयसीच्या महागड्या हौशी पूर्ण करण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलाने मित्रासोबत मिळून चोरी केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. वृद्ध महिलेच्या घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरीतील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

लष्करीबाग परिसरात राहणाऱ्या ८५ वर्षीय कौशल्याबाई गणेर यांच्या घरात घुसून आरोपींनी सुमारे ५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे टॉप्स लंपास केले होते. घटनेनंतर पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान दोन्ही अल्पवयीन मुलांचा सहभाग समोर आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. यावेळी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही नागपूर ग्रामीणमधील पाचगाव परिसरातून चोरी केल्याचे उघड झाले.

चौकशीत मुख्य आरोपीने सांगितले की, आपल्या प्रेयसीला फिरणे, खरेदी करणे आणि महागड्या भेटवस्तूंची आवड होती. तिच्या या हौशी पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासत असल्याने त्याने मित्राच्या मदतीने चोरीचा कट रचला.

सध्या पाचपावली पोलीस दोन्ही अल्पवयीन आरोपींची अधिक चौकशी करत असून त्यांच्या इतर गुन्हेगारी कृत्यांशी संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे.