
Image Source:(Internet)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण असून त्यांची कन्या रेवती सुळे आज विवाहबंधनात अडकणार आहे. रेवती यांचा विवाह नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांच्यासोबत होत असून विवाहसोहळ्याच्या पूर्वसंध्येचे आणि पूजेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या आहेत. त्यांच्या लग्नानिमित्त सुळे कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून लगबग सुरू आहे. विवाहपूर्व धार्मिक विधी आणि पूजेचे कार्यक्रम पार पडले असून त्यातील काही खास क्षणांचे छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
सारंग लखानी हे नागपूरमधील प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. ते 'विश्वराज ग्रुप'चे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत असून उद्योग क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. व्यवसायासोबतच त्यांना क्रीडा क्षेत्राचीही विशेष आवड असून ते उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून ओळखले जातात.
रेवती आणि सारंग यांच्या विवाहाची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबांकडून विवाहाची तयारी सुरू झाली. लग्नाच्या निमंत्रणासाठी सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या होत्या.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून रेवती सुळे आणि सारंग लखानी यांची सोयरीक जुळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्याकडे राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे लक्ष लागले आहे.
सुळे आणि लखानी या दोन प्रतिष्ठित कुटुंबांच्या या विवाहसोहळ्यामुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.