‘अजितदादांचे मत डावलण्याचे पाप काहींनी केले’; उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्ष निशाणा

    02-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार, वाढती गुन्हेगारी आणि उमेदवारीच्या राजकारणावर जोरदार भाष्य केले. यावेळी त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्या भूमिकेबाबतही सूचक वक्तव्य करत अप्रत्यक्ष टीका केली.

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत सुळे म्हणाल्या की, हा विषय राजकारणाचा नसून पुणेकरांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. शहरात सातत्याने घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत तफावत असल्याने नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबतही प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोलिस यंत्रणेवर भाष्य करताना त्यांनी शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांचे व्हिडीओ आणि बातम्या सातत्याने प्रसारित होत असतानाही त्याची प्रभावी दखल घेतली जात नसल्याचे म्हटले. पुण्याची प्रतिमा खराब होत असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या बैठकीत स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट करत सुळे म्हणाल्या की, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या अनेक प्रश्नांवर नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे. यासाठी दर महिन्याला बैठक आयोजित करण्यात येईल.

विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी कोणत्याही पक्षाच्या अंतर्गत निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले. मात्र, पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेल्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची खंत व्यक्त करत, “अजितदादा असते तर अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडल्या असत्या. त्यांनी पूर्वी मांडलेले मत खोडून काढण्याचे पाप काही लोकांनी केले,” असे सूचक वक्तव्य केले.

तसेच, पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारीबाबत पत्र लिहिल्याबद्दल त्यांचे स्वागत करत, पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका महाविकास आघाडीची असल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले. पुण्याची बदनामी थांबवण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.