कोरोनानंतर इबोलाचे नवे संकट; धोकादायक ‘बुंदीबुग्यो’ विषाणूविरोधात लस विकसित करण्यासाठी जागतिक शर्यत

    02-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर जगासमोर आता इबोलाच्या नव्या आणि धोकादायक बुंदीबुग्यो (Bundibugyo) प्रकाराचे आव्हान उभे ठाकले आहे. आफ्रिकेतील काँगो आणि युगांडामध्ये या विषाणूचा वेगाने प्रसार होत असून, वाढत्या मृत्यू आणि संशयित रुग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या या प्रकाराविरोधात कोणतीही मान्यताप्राप्त लस उपलब्ध नसल्याने प्रभावी लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर जागतिक महामारी प्रतिबंधक संस्था CEPI ने तब्बल ६० दशलक्ष डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे. या निधीच्या मदतीने इबोला बुंदीबुग्यो प्रकाराविरोधातील तीन महत्त्वाकांक्षी लस प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे.

या मोहिमेत अमेरिकेची Moderna, ब्रिटनचे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि International AIDS Vaccine Initiative (IAVI) यांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक निधी मॉडर्नाच्या mRNA तंत्रज्ञानावर आधारित लसीसाठी देण्यात आला असून, प्राथमिक आणि मानवी चाचण्यांसाठी सुमारे ५० दशलक्ष डॉलर्सची मदत मिळणार आहे.

विशेष म्हणजे, भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ संयुक्तपणे ‘ChAdOx1 Bundibugyo’ ही लस विकसित करत आहेत. कोविड काळात मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीसाठी वापरलेल्या तंत्रज्ञानावरच ही लस आधारित असल्याने तिच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या लसीच्या चाचण्यांसाठी आवश्यक डोसचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, बुंदीबुग्यो प्रकाराविरोधात सध्या कोणतीही अधिकृत लस किंवा प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे या लसींचा विकास हा केवळ वैज्ञानिक प्रकल्प नसून जागतिक आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील काही महिन्यांत मानवी चाचण्या सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मात्र, लस विकसित करण्याइतकेच ती संघर्षग्रस्त आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. काँगोतील अस्थिर सुरक्षा परिस्थिती, हिंसाचार आणि आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे क्लिनिकल चाचण्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, जगभरातील वैज्ञानिक, आरोग्य संस्था आणि सरकारे या संभाव्य आरोग्य संकटाला रोखण्यासाठी एकत्र आली असून, इबोलाविरोधातील प्रभावी लस विकसित करण्याची शर्यत आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे