लाडक्या बहिणींचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; निधीअभावी लाखो महिलांची प्रतीक्षा वाढली

    02-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना गेल्या चार महिन्यांपासून हप्त्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते अद्यापही अनेक महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने राज्यभरात नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे योजनेच्या वितरण प्रक्रियेला विलंब झाला. परिणामी, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया रखडली असून एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते पूर्णपणे प्रलंबित आहेत.

दरम्यान, थकीत रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने दोन टप्प्यांत निधी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते वितरित करण्यात येणार असून त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यांची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे रखडलेले पैसे नेमके कधी मिळणार, याबाबत लाखो महिलांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

याचवेळी राज्यभर सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी समोर आले आहेत. शासनाच्या छाननीत सुमारे 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी जवळपास 60 लाख महिलांनी अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे आढळले, तर सुमारे 20 लाख महिला पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे अपात्र ठरल्या आहेत.

काही लाभार्थ्यांच्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन असल्याचे, तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचेही पडताळणीत उघड झाले आहे. त्यामुळे केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभागाने छाननी अधिक कठोर केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत सुरुवातीला सुमारे 2 कोटी 31 लाख महिलांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. आता रखडलेल्या चार महिन्यांच्या हप्त्यांच्या वितरणाकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.