Image Source:(Internet)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची करण्यात आलेली पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. राज्यातील सुमारे ८० लाख महिला विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या असून, तब्बल १४ हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री (CM) देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत संबंधित पुरुष लाभार्थ्यांकडून घेतलेली संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा दिला आहे.
राज्य सरकारने ई-केवायसी, उत्पन्नाची माहिती तसेच इतर शासकीय नोंदींची छाननी केल्यानंतर अनेक लाभार्थी पात्रतेच्या निकषात बसत नसल्याचे आढळून आले. यामध्ये पुरुष, सरकारी कर्मचारी, आयकरदाते आणि इतर अपात्र लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत.
मात्र, अपात्र ठरलेल्या महिलांना सरकारने दिलासा दिला आहे. यापूर्वी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत घेतली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, खोटी माहिती देऊन किंवा फसवणूक करून लाभ मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, ई-केवायसी अपूर्ण असणे, उत्पन्नाची अट पूर्ण न होणे किंवा इतर पात्रता निकषांमध्ये न बसणे यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पात्र महिलांना योजनेचा लाभ पुढेही सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकारांवर सरकारने आता अधिक कठोर भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले आहे.