
Image Source:(Internet)
नागपूर : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नागपूर विभागाने शहरात मोठी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा उघडकीस आणला आहे. बुनकर कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात ४१९ किलोहून अधिक सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली असून, जप्त मालाची किंमत सुमारे ६ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांना बुनकर कॉलनीतील एका घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता अजहर इक्बाल रहमान कुरेशी याच्या ताब्यातील ठिकाणाहून मोठा साठा हस्तगत करण्यात आला.
तपासादरम्यान सुगंधित तंबाखूची विक्री आणि साठवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधिताविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
एफडीएकडून राज्यभर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविली जात आहे. जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर व्यवसायांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे, एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील विविध भागांत एकाच वेळी धडक कारवाया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रतिबंधित तंबाखू आणि इतर बंदी घातलेल्या पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे.