तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन बंद; आता सर्व भाविकांना एकाच रांगेतून दर्शन

    19-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानी मंदिरातील सशुल्क आणि व्हीआयपी दर्शन व्यवस्था कायमस्वरूपी बंद करण्यात आली असून, यापुढे सर्व भाविकांना समान पद्धतीने एकाच रांगेतून दर्शन घ्यावे लागणार आहे.

मंदिर ट्रस्टने दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता आणि समानता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०० आणि ५०० रुपयांचे शुल्क भरून विशेष दर्शनाची सुविधा उपलब्ध होती. या सुविधेमुळे काही भाविकांना स्वतंत्र मार्गाने जलद आणि जवळून दर्शन मिळत होते. मात्र, सामान्य रांगेतील भाविकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने याबाबत सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती.

विशेषतः सुट्ट्या, नवरात्रोत्सव आणि अन्य धार्मिक उत्सवांच्या काळात व्हीआयपी दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकांचा वेळ वाया जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने सशुल्क दर्शनासाठी असलेले स्वतंत्र मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमानुसार आता कोणत्याही भाविकाला विशेष प्राधान्य दिले जाणार नाही. सर्वांना एकाच रांगेतून आणि समान अंतरावरून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि न्याय्य होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर प्रशासनानेही भाविकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे. या काळात मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.