नागपुरातून संरक्षण स्वावलंबनाला नवी ताकद;राजनाथ सिंह यांचे विधान

    19-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : संरक्षण क्षेत्रात भारताला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने नागपुरातील अंबाझरी आयुध निर्माणी येथे उभारण्यात येणाऱ्या १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचा शुभारंभ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. हा प्रकल्प देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, बदलत्या जागतिक परिस्थितीत संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये स्वदेशी क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पामुळे क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने, अंतराळ संशोधन, रेल्वे आणि इतर सामरिक क्षेत्रांसाठी लागणारे उच्च दर्जाचे अॅल्युमिनियम घटक देशातच तयार होतील. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन देशाच्या संरक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल.

स्वदेशी तंत्रज्ञानामुळे संरक्षण क्षेत्राला नवी दिशा-
‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ देत संरक्षणमंत्र्यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. आधुनिक संरक्षण यंत्रणा अनेक महत्त्वाच्या सुट्या भागांवर आणि तांत्रिक घटकांवर आधारित असते. या प्रकल्पामुळे अशा आवश्यक घटकांचे उत्पादन देशांतर्गत होणार असल्याने संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा वेग वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

संरक्षण उत्पादन आणि निर्यातीमध्ये विक्रमी वाढ-
गेल्या काही वर्षांत भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली असल्याचे सांगताना राजनाथ सिंह यांनी २०१४ मधील सुमारे ४६ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनातून देश १.७८ लाख कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचल्याचे सांगितले. संरक्षण निर्यातीतही मोठी वाढ झाली असून भारत आता जागतिक संरक्षण बाजारात आपली मजबूत उपस्थिती निर्माण करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर ठरणार संरक्षण उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून नागपूर देशातील महत्त्वाच्या संरक्षण उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून उदयास येईल, असे ते म्हणाले.

अंबाझरी आयुध निर्माणीतील हा अत्याधुनिक प्रकल्प भारताच्या संरक्षण स्वावलंबनाच्या प्रवासातील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जात आहे.