
Image Source:(Internet)
देशभरातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील कथित पेपर लीक प्रकरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या गोंधळाबाबत चिंता व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दीपके यांनी पत्रात म्हटले आहे की, परीक्षा प्रक्रियेतील वारंवार होणाऱ्या त्रुटी, पेपरफुटीच्या घटना आणि त्यानंतर निर्माण होणारी अनिश्चितता यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अनेक कुटुंबे चिंतेत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांसाठी मदतीची मागणी-
पेपर लीक प्रकरणामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख करत दीपके यांनी अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. अनेक पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी कर्जे काढली असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
जबाबदारी निश्चित करणे आवश्यक-
शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. शिक्षणमंत्र्यांवर कारवाई झाल्यास सरकारची प्रतिमा कमकुवत होणार नाही, उलट उत्तरदायित्व स्वीकारण्याची तयारी दिसून येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा एल्गार-
या मुद्द्यावर देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असून २० जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहावे आणि शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी या आंदोलनातून केली जाणार असल्याचे दीपके यांनी सांगितले.
पेपर लीक प्रकरणामुळे निर्माण झालेला रोष आता रस्त्यावर उतरू लागला असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.