अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ ट्रेलर रिलीज; कॉमेडी, अॅक्शनसह ३० स्टार्सची मेगा मेजवानी

    19-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : बॉलिवूडमध्ये मल्टिस्टारर चित्रपटांची परंपरा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याने रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कॉमेडी आणि अॅक्शनचा जबरदस्त संगम असलेल्या या ट्रेलरमध्ये ३० हून अधिक कलाकार एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत.

चार मिनिटांहून अधिक कालावधीच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना जंगलातील गोंधळ, भन्नाट कॉमेडी आणि थरारक अॅक्शनचा तिहेरी डोस पाहायला मिळतो. ट्रेलरमधील वेगवान कथानक आणि कलाकारांची धमाल केमिस्ट्री चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची भव्य स्टारकास्ट. अक्षय कुमारसोबत संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॅकी श्रॉफ, रविना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस आणि दिशा पटानी यांसारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर जॉनी लिव्हर, राजपाल यादव, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, श्रेयस तळपदे, तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी यांची उपस्थिती चित्रपटातील विनोदाची रंगत आणखी वाढवणार आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच दिलेला हटके डिस्क्लेमर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो, तर पुढील प्रत्येक दृश्यात गोंधळ, विनोद आणि मनोरंजनाचा भडिमार पाहायला मिळतो. त्यामुळे हा चित्रपट केवळ कॉमेडीपुरता मर्यादित न राहता एक भव्य मनोरंजन पॅकेज ठरणार असल्याचे संकेत ट्रेलरमधून मिळत आहेत.

अहमद खान दिग्दर्शित आणि फिरोज ए. नाडियाडवाला निर्मित ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट २६ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.