नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; १४ केंद्रांवर प्रक्रिया सुरू

    18-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून जिल्ह्यातील ८३६ लोकप्रतिनिधी आपला मताधिकार बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात सुरू आहे.

जिल्हाभरात १४ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका सदस्य या निवडणुकीत मतदार म्हणून सहभागी होत आहेत.

मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.

मतदान पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या कडेकोट बंदोबस्तात बचत भवन येथील स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर २२ जून रोजी मतमोजणी होणार असून निकालातून मतदारांनी कोणाला पसंती दिली हे स्पष्ट होईल.

दरम्यान, स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील ही पोटनिवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असल्याने सर्वच पक्षांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांचे प्रतिबिंब या निकालात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.