मुंडन समारंभावरून परतताना काळाचा घाला; हिमाचलमध्ये बोलेरो दरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू

    18-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

चंबा : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात बुधवारी रात्री भीषण रस्ता अपघात घडून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंडन समारंभ आटोपून आपल्या गावाकडे परतणाऱ्या नागरिकांना घेऊन जाणारी बोलेरो गाडी छतरुंड परिसरात नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, चंबा-मसरुंड मार्गावरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडी शेकडो फूट खोल दरीत जाऊन पडल्याने वाहनाचा चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

मृतांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असून सर्वजण एकाच गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रात्रीच्या अंधारात आणि दुर्गम भागात बचावकार्य राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.