
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली असून, पक्षाच्या ९ लोकसभा खासदारांपैकी तब्बल ६ खासदार फुटण्याच्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत खासदारांची तातडीची बैठक बोलावत ‘थ्री-लाइन व्हिप’ जारी केला होता. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीला केवळ ३ खासदार उपस्थित राहिल्याने पक्षातील अस्वस्थता उघड झाल्याचे मानले जात आहे.
बैठकीला खासदार संजय राऊत यांच्यासह अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. उर्वरित खासदार गैरहजर राहिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उद्धव ठाकरे गटातील ६ खासदार शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षात येण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या फुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बंडखोरांवर संजय राऊत यांचा हल्लाबोल-
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी गैरहजर खासदारांवर जोरदार टीका केली. “जे बैठकीला आले ते आमचे, जे आले नाहीत ते बेईमान आणि गद्दार आहेत,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच काही खासदारांना ‘१५-१५ कोटी रुपये’ देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
जिथे ठाकरे, तिथेच खरी शिवसेना-
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत आणि अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या दाव्यांना फेटाळून लावले. “शिवसेनेची खरी विचारधारा आणि वारसा ठाकरे यांच्यासोबतच आहे. जिथे ठाकरे, तिथेच खरी शिवसेना,” असा दावा त्यांनी केला. तसेच विरोधकांकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
लोकसभा अध्यक्षांशी संपर्क?
सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अनौपचारिक भेट घेतल्याची चर्चा आहे. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई टाळण्यासाठी दोन-तृतीयांश म्हणजेच ९ पैकी किमान ६ खासदारांचे समर्थन आवश्यक असते. ते समर्थन आपल्याकडे असल्याचा दावा संबंधित गटाकडून केला जात आहे.
शिस्तभंगाची कारवाई शक्य-
पक्षाच्या व्हिपकडे दुर्लक्ष करून बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांना शिवसेना (यूबीटी) कडून कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पक्षावरील पकड कायम ठेवण्यात यशस्वी ठरतात की त्यांना पुन्हा एका मोठ्या राजकीय धक्क्याला सामोरे जावे लागते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.