ठाकरे गटाला मोठा धक्का; सहा खासदारांनी व्हीप झुगारला, फुटीच्या चर्चांना बळ!

    18-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील राजकीय संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. पक्षाने बोलावलेल्या संसदीय बैठकीला सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गटात फूट पडल्याच्या चर्चांना जोर आला आहे. पक्षाकडून व्हीप बजावल्यानंतरही या खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आज सकाळी ११ वाजता दिल्लीतील संसद भवन परिसरात खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व खासदारांनी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष बैठकीत ठाकरे गटाचे मोजकेच खासदार उपस्थित राहिले, तर चर्चेत असलेले सहा खासदार गैरहजर राहिले.

बैठकीला संजय राऊत ,अनिल देसाई,अरविंद सावंत यांच्यासह काही खासदार उपस्थित होते. मात्र बंडखोरीच्या चर्चेत असलेले सहा खासदार बैठकीपासून दूर राहिले.

कोणते खासदार राहिले अनुपस्थित?
अनुपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये —
संजय दिना पाटील
संजय देशमुख
संजय (बंडू) जाधव
ओमराजे निंबाळकर
संजय वाकचौरे
नागेश पाटील आष्टीकर

यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

ठाकरे गटाकडून कायदेशीर कारवाईची शक्यता
व्हीप बजावल्यानंतरही खासदार गैरहजर राहिल्याने आता ठाकरे गटाकडून या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई आणि अपात्रतेच्या प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

शिंदे गटात विलिनीकरणाची चर्चा-
दरम्यान, सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात जाणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.