मान्सूनची प्रतीक्षा लांबली; नागपूरकर उकाड्याने त्रस्त

    18-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : जून महिना अर्धा संपत आला तरी नागपूरसह संपूर्ण विदर्भात मान्सूनचे आगमन अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. पावसाने पाठ फिरवल्याने उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले असून पुढील काही दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची वाटचाल मंदावल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. साधारणपणे या कालावधीत विदर्भात पावसाचा जोर वाढत असतो. मात्र, यंदा मान्सून महाराष्ट्रातच रखडल्याने नागपूरसह अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा कायम आहे. शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावले असून उष्णतेची तीव्रता वाढली आहे.

पूर्व विदर्भ आणि छत्तीसगड परिसरात वरच्या वातावरणात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र, व्यापक स्वरूपातील पावसासाठी आवश्यक पोषक परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे आकाशात ढग दिसत असले तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची निराशाच होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २३ जूनपर्यंत नागपूर आणि आसपासच्या भागात ढगांची वर्दळ कायम राहू शकते. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असली तरी जोरदार पावसाचे संकेत अद्याप नाहीत. परिणामी, उकाडा आणि आर्द्रतेचा दुहेरी फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

बुधवारीही शहरात दिवसभर कडक ऊन होते. सायंकाळी वातावरणात काहीसा बदल जाणवला, मात्र पावसाने हजेरी लावली नाही. सूर्यास्तानंतरही हवेत गारवा नसल्याने उष्णता आणि अस्वस्थता कायम राहिली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांसाठी पुढील काही दिवस आणखी संयमाची परीक्षा घेणारे ठरणार असल्याचे चित्र आहे.