
Image Source:(Internet)
डोंबिवली : चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम परीक्षा मे २०२६ च्या निकालात डोंबिवलीतील सोहन अनिल मांजरेकर याने देशात तिसरा क्रमांक मिळवत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. भारतीय सनदी लेखापाल संस्था (ICAI) यांनी जाहीर केलेल्या निकालात सोहनने ऑल इंडिया रँक (AIR) ३ मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये सोहनने अव्वल स्थान पटकावत आपल्या मेहनतीची आणि जिद्दीची छाप उमटवली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे डोंबिवलीसह संपूर्ण राज्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या परीक्षेत पटियाळातील नूर सिंगला प्रथम, तर हावड्याचा रितीज सराफ द्वितीय क्रमांकावर राहिला. सोहनने तिसरे स्थान मिळवत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ठळकपणे नोंदवले.
मे २०२६ सत्रातील सीए अंतिम परीक्षा दोन गटांमध्ये पार पडली होती. या परीक्षेत देशभरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. निकालासोबतच ICAI ने गुणवत्ता यादी, उत्तीर्णतेची टक्केवारी आणि अव्वल विद्यार्थ्यांची नावेही जाहीर केली आहेत.
सोहनच्या यशामुळे डोंबिवलीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्या या कामगिरीकडे तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते, हे सोहनने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.