
Image Source:(Internet)
मुंबई : आयपीएल 2026 हंगाम संपताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील हंगामाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. आयपीएलच्या 20 व्या पर्वाचे वेळापत्रक, कालावधी आणि सामन्यांची संख्या यावर प्राथमिक चर्चा सुरू असून स्पर्धा यावेळी नेहमीपेक्षा काही आठवडे आधी सुरू होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 2027 स्पर्धा 10 मार्चपासून सुरू करून 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. देशातील अनेक भागांमध्ये मे महिन्याच्या उत्तरार्धात वाढणारा उष्मा आणि बदलते हवामान लक्षात घेऊन हा पर्याय पुढे आला आहे. खेळाडूंना अधिक अनुकूल परिस्थितीत सामने खेळता यावेत, हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनीही स्पर्धा लवकर सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदाच्या हंगामाला मार्चच्या अखेरीस सुरुवात झाली होती, मात्र पुढील पर्वाचे वेळापत्रक जवळपास तीन आठवडे पुढे आणण्याचा विचार सुरू आहे.
दरम्यान, आयपीएल 2027 मध्ये सामन्यांची संख्या वाढवली जाणार असल्याच्या चर्चांनाही बीसीसीआयने पूर्णविराम दिला आहे. काही अहवालांमध्ये 94 सामने खेळवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, सध्या तरी अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार सुरू नसल्याचे सैकिया यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे आगामी हंगामातही यंदाप्रमाणेच 74 सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेला अजून बराच कालावधी शिल्लक असल्याने पुढील काही महिन्यांत फ्रेंचायझींच्या रणनीती, खेळाडू बदल आणि संघरचनेबाबत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे.