ऑपरेशन टायगरच्या चर्चांना वेग; ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत, राजकीय हालचालींना उधाण

    17-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच ठाकरे गटातील सहा खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीकडे रवाना झाल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नांदेडहून संध्याकाळी चार्टर्ड विमानाने काही खासदार दिल्लीला पोहोचले. यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख यांच्यासह एकूण सहा खासदार असल्याची चर्चा आहे. हे खासदार काही काळ संपर्काबाहेर असल्याचेही सांगितले जात असून त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

ठाकरे गटाकडे सध्या लोकसभेत नऊ खासदार आहेत. त्यापैकी सहा खासदार दिल्लीत दाखल झाल्याचे सांगितले जात असले तरी सहावा खासदार नेमका कोण याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दरम्यान, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे देखील दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर आली असून त्यांच्याबाबतही चर्चांना जोर आला आहे.

या सर्व घडामोडींची पार्श्वभूमी १४ जून रोजी झालेल्या ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीशी जोडली जात आहे. त्या बैठकीला पाच खासदार अनुपस्थित राहिल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि संभाव्य राजकीय बदलांच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर आता काही खासदारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत काही खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊ शकतात. तसेच त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दुसरीकडे, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. संभाव्य राजकीय आणि कायदेशीर परिणामांच्या पार्श्वभूमीवर ते विविध तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळेही राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना आणखी धार मिळाली आहे.

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव देखील या घडामोडींमध्ये चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अशा चर्चांचे खंडन करताना “माझी सही दुसरे कोणी करू शकत नाही,” असे म्हटले होते. मात्र त्यानंतर ते हैदराबाद विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

दिल्लीतील बैठका आणि पुढील राजकीय हालचालींनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.