वणीत एमडी ड्रग्सचा साठा जप्त; क्राइम ब्रँचची धडक कारवाई, दोन युवक जेरबंद

    17-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

यवतमाळ : जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून वणी येथे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सची विक्री करणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत अमली पदार्थांसह रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण सुमारे १.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला वणी शहरात एमडी ड्रग्सची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी वणीतील एसपीएम शाळेजवळ, नगर परिषद शाळा क्रमांक ३ समोरील मोकळ्या मैदान परिसरात सापळा रचला. यावेळी दोन संशयित युवक दुचाकीजवळ उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ५.०९१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थांसह रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६३ हजार ७० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सौरभ दिनेश खैरे (२५) आणि प्रथमेश विनोद गुंडेवार (२०) अशी आहेत. दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. युवकांना नशेच्या विळख्यात अडकवणाऱ्या अशा अवैध रॅकेटविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.