तांदळातील कीटकनाशकाचा जीवघेणा परिणाम; गिरगावातील दोन वर्षांच्या चिमुरडीची मृत्यूशी झुंज!

    16-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : घरातील तांदूळ कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या कीटकनाशकामुळे गिरगावातील एका दोन वर्षांच्या चिमुरडीवर जीवघेणी वेळ ओढवली आहे. विषारी वायू श्वासावाटे शरीरात गेल्याने मुलीला गंभीर विषबाधा झाली असून ती सध्या रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी तांदळाच्या मोठ्या डब्यात उंदीर व इतर कीटकांपासून संरक्षणासाठी ‘ॲल्युमिनियम फॉस्फाइड’ हे अत्यंत घातक कीटकनाशक ठेवले होते. त्यानंतर घरात सतत तीव्र दुर्गंधी पसरत होती. याच विषारी वायूचा परिणाम मुलीच्या आरोग्यावर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून चिमुरडीला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू होता. प्रकृती अधिकच खालावल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अवघ्या १५ तासांच्या कालावधीत तिला तब्बल तीन वेळा हृदयविकाराचे झटके आल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले.

या घटनेत मुलीच्या मोठ्या बहिणीलाही विषारी वायूचा फटका बसला. तिलाही उलट्या-जुलाबाचा त्रास झाला होता. मात्र उपचारानंतर तिची प्रकृती सुधारली आहे.

सध्या चिमुरडीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिला ‘एक्मो’ (ECMO) आणि ‘सीआरआरटी’ (CRRT) या अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणालींचा आधार देण्यात आला आहे. ॲल्युमिनियम फॉस्फाइडच्या विषबाधेवर कोणतेही विशिष्ट प्रतिऔषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर लक्षणांवर आधारित उपचार करत आहेत.

दरम्यान, घरगुती वापरासाठी ठेवण्यात येणाऱ्या कीटकनाशकांच्या सुरक्षिततेबाबत या घटनेने गंभीर प्रश्न निर्माण केले असून, अशा रसायनांचा वापर करताना अत्यंत काळजी घेण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.