घरफोडीसह वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; यशोधरानगर पोलिसांनी चौघांना केली अटक

    16-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी यशोधरानगर पोलिसांनी धडक कारवाई करत घरफोडी आणि वाहनचोरीच्या तब्बल 8 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास 6 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत आरोपींनी नागपूर शहरातील विविध भागांसह ग्रामीण परिसरात चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली. यामध्ये यशोधरानगर, अंबाझरी, रणप्रतापनगर, लकडगंज, पाचपावली तसेच रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा समावेश आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये शेख मोहिउद्दीन उर्फ रहीम शेख कलीम, मोहम्मद कैफ असमुद्दीन अन्सारी, नरेंद्र उर्फ बाली चिंतामण चौके आणि निलेश मुरलीधर बाचे यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या चार दुचाकी, दोन स्कूटर, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 6 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची पडताळणी करण्यात आली.

यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या कारवाईमुळे चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीचा पर्दाफाश झाला असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.