
Image Source:(Internet)
नागपूर : मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करणे आणि स्त्री भ्रूणहत्येसारख्या सामाजिक समस्यांना आळा घालणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ सुरू केली आहे. महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील हजारो कुटुंबांसाठी मुलींच्या भवितव्याचा आर्थिक आधार ठरत आहे.
मुलीच्या नावाने ठेवली जाते रक्कम-
या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला थेट रोख रक्कम दिली जात नाही. त्याऐवजी शासनाकडून मुलीच्या नावाने बँकेत मुदत ठेव (एफडी) करण्यात येते.
पहिली मुलगी जन्मल्यानंतर तिच्या नावाने ५० हजार रुपयांची मुदत ठेव केली जाते.
दुसरी मुलगी झाल्यास दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी २५ हजार रुपयांची मुदत ठेव केली जाते.
यासाठी पालकांनी ठराविक कालावधीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
शिक्षणासाठी मिळतो आर्थिक हातभार-
मुलीच्या नावाने जमा केलेल्या रकमेवरील व्याज तिच्या ६ व्या आणि १२ व्या वर्षी शिक्षणासाठी वापरता येते. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मूळ रक्कम आणि उर्वरित व्याज एकरकमी दिले जाते.
मात्र, अंतिम लाभ मिळवण्यासाठी मुलगी अविवाहित असणे आणि किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कोणाला मिळतो लाभ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. योजना जास्तीत जास्त दोन मुलींपर्यंत मर्यादित आहे. तिसरे अपत्य झाल्यास योजनेचा लाभ बंद होतो.
दुसऱ्या प्रसूतीमध्ये जुळ्या मुली जन्माला आल्यास दोघींनाही लाभ दिला जातो. तसेच अनाथ मुली आणि कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलींनाही योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
अर्जासोबत मुलीचा जन्मदाखला, पालकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुकची प्रत, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र आणि मुलीचा फोटो जोडणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करायचा?
योजनेचा अर्ज स्थानिक अंगणवाडी, ग्रामपंचायत किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) कार्यालयातून मिळू शकतो. तसेच महिला व बालविकास विभागाच्या संकेतस्थळावरूनही अर्ज डाउनलोड करता येतो.
फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा केल्यानंतर पडताळणी केली जाते. पात्रता निश्चित झाल्यास शासनाकडून मुलीच्या नावाने बँकेत मुदत ठेव जमा केली जाते.
मुलींच्या भविष्यासाठी महत्त्वाची योजना
‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही केवळ आर्थिक मदत नसून मुलींचे शिक्षण, सक्षमीकरण आणि सुरक्षित भविष्य घडविण्याचा शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जातो. त्यामुळे पात्र कुटुंबांनी या योजनेची माहिती घेऊन वेळेत अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.