'370 च्या बिर्याणी'वरून वाद ; प्रणित मोरेसह सेजल पवार यांना सायबर पोलिसांचे समन्स

    16-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका स्टँडअप कॉमेडी शोतील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे कॉमेडियन प्रणित मोरे आणि केईएम रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून त्यांचे जबाब आता 17 जून रोजी नोंदवले जाणार आहेत.

महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्याने प्रणित मोरे, सेजल पवार तसेच गुरुग्राममधील प्रेक्षक हिमांशू जांगडा यांना 16 जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार प्रणित मोरे आणि सेजल पवार यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करण्याची भूमिका घेत चौकशीसाठी एक दिवसाची मुदत मागितली. त्यामुळे त्यांना बुधवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओतील वक्तव्यांमुळे धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र सायबरकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवत तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणात सर्व संबंधितांवर समान कायदेशीर प्रक्रिया राबवली जात असून तपास निष्पक्षपणे केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, हिमांशू जांगडा यांनाही चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या बाजूने अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. ते चौकशीसाठी गैरहजर राहिल्यास त्यांना पुन्हा समन्स बजावले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान महाराष्ट्र सायबर प्रणित मोरे यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील पोस्ट, व्हिडिओ आणि इतर डिजिटल सामग्रीचीही तपासणी करत आहे. संबंधित पोस्टमधून कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाले आहे का, याची छाननी सुरू असल्याचे समोर आले आहे.

वादानंतर प्रणित मोरेची माफी, सेजलवर प्रशासकीय कारवाई-
व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर प्रणित मोरे यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली होती. दुसरीकडे, केईएम रुग्णालय प्रशासनाने सेजल पवार हिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तर या वादग्रस्त प्रकरणानंतर हिमांशू जांगडा यांची नोकरीही गेल्याची माहिती समोर आली आहे.

'370 च्या बिर्याणी'वरून सुरू झालेला वाद आता थेट सायबर पोलिसांच्या चौकशीपर्यंत पोहोचला असून बुधवारी होणाऱ्या जबाब नोंदविण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.