
Image Source:(Internet)
अमरावती : राज्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या भाडे सवलतीसाठी आता स्मार्ट कार्ड आवश्यक ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्डशिवाय सवलतीचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एसटी प्रवास अधिक तंत्रज्ञानाधारित आणि सुलभ करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरातील तब्बल ५१ लाख प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी अर्ज केला असून २५ लाखांपेक्षा जास्त कार्डांचे वितरण पूर्ण झाले आहे.
नोंदणी आणि कार्ड वाटपासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे पोहोचल्या आहेत. याची गंभीर दखल घेत अतिरिक्त शुल्क वसूल करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
एसटी महामंडळाने पात्र प्रवाशांना १ ऑगस्टपूर्वीच जवळच्या अधिकृत केंद्रात जाऊन स्मार्ट कार्ड मिळवण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा नव्या नियमांनुसार सवलतीच्या तिकिटाचा लाभ घेता येणार नाही.