
Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश शाळांमध्ये आज, १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग नियमित वेळेत सुरू झाले असून विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. यंदाही शिक्षण पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीनेच दिले जाणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभर 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत विविध उपक्रमांद्वारे करण्यात येत असून अनेक शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरणही सुरू झाले आहे.
मात्र, विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी शाळेची घंटा अजून वाजलेली नाही. वाढत्या उष्णतेचा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील सर्व शाळांना ३० जूनपर्यंत सुट्टी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या विभागातील शाळांमध्ये १ जुलैपासून नियमित अध्यापन सुरू होणार आहे.
दुसरीकडे मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शाळांनी आजपासूनच विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नव्या दप्तरासह आणि नव्या उत्साहासह विद्यार्थ्यांनी शाळांकडे धाव घेतल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळाले.
दरम्यान, शिक्षण विभागाने पालकांनी आपल्या शाळांशी संपर्कात राहावे आणि उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.