परंपरांचा सन्मान राखा, वाद टाळा’; जैन पट्टा प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका

    15-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : दादर परिसरात जैन धर्मगुरूंच्या मार्गक्रमणासाठी रस्त्यांवर करण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या चिन्हांकनावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम आणि परस्पर आदराची भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असून सामाजिक सलोखा टिकवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रत्येक समाजाच्या काही परंपरा आणि धार्मिक श्रद्धा असतात. त्या जपण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, अशा विषयांवरून समाजात मतभेद किंवा संघर्षाचे वातावरण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे प्रयत्न टाळले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दादर पश्चिममधील काही रस्त्यांवर जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी आणि मार्गक्रमणासाठी पांढरे पट्टे रंगविण्यात आले होते. या प्रकारावर मनसेने तीव्र आक्षेप नोंदवत ते तातडीने हटविण्याची मागणी केली. यानंतर मनसे आणि जैन समाजातील काही प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने प्रकरण चर्चेचा विषय बनले.

परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित रस्त्यांवरील पट्टे हटविले. या हस्तक्षेपामुळे संभाव्य तणाव टळला असला तरी या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया आणि चर्चा सुरूच आहेत.

यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या अर्थखात्यावरील वक्तव्याबाबत विचारले असता, फडणवीस यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली. राज्यात अर्थखाते सांभाळण्याची क्षमता असलेले अनेक नेते असल्याचे सांगत त्यांनी भविष्यातील शक्यता नाकारल्या नाहीत.