
Image Source:(Internet)
मुंबई : काही दिवसांत शरीर सुडौल होईल, स्तनांचा आकार वाढेल, वजन झटपट कमी होईल अशा आकर्षक दाव्यांमुळे बाजारात विकल्या जाणाऱ्या अनेक उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा प्रहार केला आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 34.61 लाख रुपयांचा नियमबाह्य आणि संशयित माल जप्त करण्यात आला असून, सौंदर्याच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यवसायाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सातारा, मुंबई आणि कांदिवली येथे छापेमारी करण्यात आली. तपासादरम्यान अनेक उत्पादनांवर आवश्यक माहितीच नसल्याचे उघड झाले. उत्पादकाचे नाव, उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक आणि परवाना यासारखे महत्त्वाचे तपशील नसतानाही ही उत्पादने ग्राहकांना विकली जात होती.
विशेष म्हणजे, शरीराचा आकार बदलण्याचे दावे करणारी उत्पादने मुंबईतील गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळले. 'ब्रेस्ट एन्लार्ज', 'बट एन्हान्समेंट' आणि 'फॅट बर्नर' अशा नावांनी विकल्या जाणाऱ्या उत्पादनांबाबत कोणतीही ठोस वैज्ञानिक पडताळणी किंवा अधिकृत प्रमाणिकता असल्याचे दिसून आले नाही.
सोशल मीडियावरील जाहिराती आणि इन्फ्लुएन्सर्सच्या प्रचारामुळे अशा उत्पादनांची मागणी वाढत आहे. आकर्षक शरीरयष्टीचे स्वप्न दाखवत ग्राहकांना मोठमोठी आश्वासने दिली जातात. मात्र या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही खात्री नसल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता FDA ने व्यक्त केली आहे.
या कारवाईमुळे सौंदर्य उद्योगातील अनियंत्रित आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेषतः महिलांच्या भावनांचा आणि आत्मविश्वासाचा आधार घेत बाजारपेठ वाढविणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
FDA च्या या धाडीमुळे 'परफेक्ट फिगर'चे स्वप्न विकणाऱ्या व्यवसायांना मोठा धक्का बसला असून, ग्राहकांनी कोणतेही सौंदर्यवर्धक उत्पादन वापरण्यापूर्वी त्याची वैधता तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.