
Image Source:(Internet)
मुंबई : एप्रिल २०२६ मध्ये राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तब्बल १४.५८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली ही मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे मदतीचे वितरण अधिक जलद आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने मदत मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
मदत वाटप प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाला लाभार्थ्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये अचूकपणे नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पंचनाम्यांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, नुकसानभरपाईची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.