काँग्रेसमध्ये विलयाच्या चर्चांना सुप्रिया सुळेंचा पूर्णविराम; ‘देशासमोरील प्रश्नांवर चर्चा करा’

    13-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना खासदार तथा पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “अशा कोणत्याही प्रस्तावाची माहिती ना मला आहे, ना शरद पवार साहेबांना,” असे सांगत सुरू असलेल्या चर्चांवर पूर्णविराम दिला.

सुळे म्हणाल्या की, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. मात्र लोकशाही व्यवस्थेत संवाद आणि चर्चा ही नियमित प्रक्रिया असून त्यातून विलयाचे निष्कर्ष काढणे योग्य नाही. त्या स्वतःही विविध केंद्रीय मंत्री आणि नेत्यांना भेटत असतात, असे त्यांनी नमूद केले.

देशातील आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि युवकांसमोरील आव्हाने याकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून देशाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

“राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर उपाय शोधणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी सर्व पक्षांनी लोकहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

शेतकरी प्रश्नांवर बोलताना सुळे यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत सरकारने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सुळे यांनी स्पष्ट केले की, देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक आव्हानांवर तोडगा काढणे हीच आजची खरी गरज असून राजकीय अफवांपेक्षा जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.