आसाममध्ये वायुसेनेच्या AN-32 विमानाचा भीषण अपघात; पायलटसह पाच जवानांचा मृत्यू

    13-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

आसाम- जोरहाट येथील रोरिया एअरबेसवर शनिवारी सकाळी भारतीय वायुसेनेच्या AN-32 मालवाहू विमानाचा गंभीर अपघात झाला. लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान विमान कोसळून त्याला आग लागल्याने पायलटसह पाच जवानांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सह-पायलट गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, नियमित उड्डाण पूर्ण करून विमान एअरबेसवर उतरत असताना अंतिम टप्प्यात नियंत्रण बिघडल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली आणि काही क्षणांतच विमानाचे दोन तुकडे झाले.

या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायु खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायु दानिश आलम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

भारतीय वायुसेनेने जारी केलेल्या निवेदनात विमान नियमित मोहिमेवर असल्याचे सांगितले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे नमूद केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'ची स्थापना करण्यात आली आहे. तांत्रिक दोष, हवामानातील बदल किंवा अन्य कोणता घटक अपघातास कारणीभूत ठरला का, याचा तपास केला जाणार आहे.

AN-32 हे भारतीय वायुसेनेच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचे विमान मानले जाते. दुर्गम आणि प्रतिकूल भागांमध्ये सैनिक व लष्करी साहित्य पोहोचवण्यासाठी या विमानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सध्या वायुसेनेकडे अशा सुमारे 100 विमानांचा ताफा असून 1980 पासून ही विमाने सेवेत आहेत.

या दुर्घटनेमुळे संरक्षण क्षेत्रात शोककळा पसरली असून मृत जवानांना विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.