
Image Source:(Internet)
नागपूर : राज्य सरकारच्या कर्जमाफी निर्णयानंतर शेतकरी आणि विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. कर्जमाफीबाबत काही अटी कायम राहणार असून, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे समाधान होईलच असे नाही, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
कर्जमाफीतील अटी हटवून सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील.
रोहित पवार यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे सांगत भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. या बैठकीत रोहित पवार यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या अटींबाबत बोलताना भरणे म्हणाले की, राज्याच्या आर्थिक तिजोरीवर ताण असतानाही सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, "सर्व शेतकऱ्यांचे समाधान होईलच असे नाही, पण हा निर्णय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हिताचा आहे," असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या बैठकीकडे शेतकरी, विरोधक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, कर्जमाफीच्या अटींमध्ये काही बदल होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.