
Image Source:(Internet)
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी भेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या निर्देशानुसार १० जून रोजी राज्यभरात एकाच वेळी व्यापक धाडसत्र राबविण्यात आले. या मोहिमेत ३० ठिकाणी कारवाई करत सुमारे ३ कोटी ९५ लाख ४७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
या कारवाईदरम्यान प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच संशयित आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. राज्यभरातील विविध ठिकाणी झालेल्या धाडीत २१ जणांना अटक करण्यात आली असून १७ आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध मालाच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक वाहनही जप्त करण्यात आले.
मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागांमध्ये ही मोहीम एकाच वेळी राबविण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी १३ आस्थापनांची तपासणी करून सुपारी, खाद्यतेल, पिण्याचे पाणी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढे, तूप आणि गूळ यांसारख्या खाद्यपदार्थांचा एक लाख सात हजार किलोहून अधिक साठा जप्त केला. या साठ्याची किंमत ३ कोटी ९४ लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.
जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गुटखा आणि पानमसाल्याची बेकायदा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरोधात १२ स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
एफडीएच्या इतिहासातील अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून, तुकाराम मुंढे यांच्या कठोर भूमिकेमुळे राज्यातील भेसळखोर आणि अवैध व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अशाच स्वरूपाच्या आणखी कठोर मोहिमा आगामी काळात राबवल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.