विरोधक एकत्र आले तरी भाजपचेच बळ वाढणार; TMC-राष्ट्रवादीच्या विलीनीकरण चर्चांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

    12-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : तृणमूल काँग्रेस (TMC) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत भाजपला त्याची कोणतीही चिंता नसल्याचे स्पष्ट केले. उलट अशा घडामोडींमुळे भाजपसाठी अधिक राजकीय संधी निर्माण होतील, असा दावा त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांवर अनेकजण भाष्य करत आहेत. मात्र संबंधित पक्षांचे नेते अनुभवी असून ते आपले राजकीय भविष्य लक्षात घेऊनच निर्णय घेतील. काँग्रेसची सध्याची स्थिती पाहता ते सहजपणे असा निर्णय घेतील, असे वाटत नाही.

फडणवीस यांनी यावेळी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “ज्यांचा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी थेट संबंध नाही, तेच या विषयावर सर्वाधिक प्रतिक्रिया देताना दिसतात,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

“जर हे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झालेच, तर त्यामुळे विरोधकांची स्वतंत्र राजकीय ओळख आणखी कमी होईल. त्यातून निर्माण होणारी राजकीय पोकळी भाजपसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे या चर्चांमुळे आम्हाला कोणताही त्रास नाही. आम्ही केवळ घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत,” असे फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचाही गौरव केला. देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये एनडीएची सत्ता असून विकास आणि जनकल्याणाच्या योजनांमुळे जनतेचा विश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.

जीएसटी महसूल, डिजिटल व्यवहार, यूपीआयचा जागतिक विस्तार, शेतकरी आणि महिलांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख करत मोदी सरकारने गेल्या दशकात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.

दरम्यान, विरोधकांच्या संभाव्य आघाड्या आणि विलीनीकरणाच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, फडणवीसांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.