पोलिसांची नोटीस, तरीही रोहित पवार आंदोलनावर ठाम; पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

    12-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पंढरपूर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र आंदोलनापूर्वीच पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारत नोटीस बजावल्याने या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तसेच शहरातील प्रमुख चौकातील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, या कारणांमुळे पोलिसांनी आंदोलनास मंजुरी नाकारल्याची माहिती आहे. याशिवाय प्रशासनाने पर्यायी जागेचा प्रस्तावही आंदोलनकर्त्यांसमोर ठेवला. मात्र रोहित पवार यांनी मूळ ठिकाणीच आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

या आंदोलनाची माहिती पक्षातील सर्वच नेत्यांना नव्हती, अशी बाबही समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे काही आमदारांनी आंदोलनाबाबत पूर्वकल्पना नसल्याचे सांगितल्याने पक्षांतर्गत संवाद आणि समन्वयाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, नोटीस मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू केलेला लढा कोणत्याही दबावामुळे मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी आंदोलनाचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. त्यामुळे प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोहित पवार यांच्या भूमिकेमुळे पंढरपुरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, पोलिस प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते आणि आंदोलन नियोजितप्रमाणे होते का, याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.