शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा; फक्त एकच अट, ४० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

    12-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले.

कर्जमाफी योजनेत कोणत्याही कठोर अटी-शर्ती नसल्याचे सांगताना त्यांनी फक्त एकच अट ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले. शेती क्षेत्रासमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, भविष्यात शेतकऱ्यांना ‘क्लायमेट-प्रूफ’ शेतीकडे वळावे लागणार आहे.

राज्य सरकारची कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी असून त्यात अनावश्यक अटी लादण्यात आलेल्या नाहीत. मात्र, राज्यातील सहकारी बँकिंग व्यवस्था टिकून राहणे आवश्यक असल्याने एक विशेष अट ठेवण्यात आली आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या कर्जदारांना यापूर्वी अनेकदा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्यांनाही यावेळी मदत केली जाईल.

मात्र ठरावीक मर्यादेपर्यंतचीच रक्कम माफ करण्यात येणार असून उर्वरित रक्कम त्यांना भरावी लागेल. अन्यथा जिल्हा सहकारी बँका आणि ग्रामीण बँकिंग व्यवस्था आर्थिक संकटात सापडू शकते. मुख्यमंत्र्यांच्या मते, या निर्णयाचा लाभ राज्यातील ४० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी आणि प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणी तातडीने सोडवता याव्यात यासाठी विशेष मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे.

विरोधकांच्या दबावामुळे नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने स्वतःहून हा निर्णय घेतल्याचा दावा करत फडणवीस म्हणाले, "सध्या कोणतीही मोठी निवडणूक समोर नाही. राजकीय फायद्याचा विचार केला असता आम्ही २०२८ च्या अखेरीस कर्जमाफी जाहीर केली असती. मात्र शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने आताच हा निर्णय घेतला आहे." राज्य सरकारचा उद्देश केवळ कर्जमाफी देणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी अधोरेखित केले.