
Image Source:(Internet)
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या Mamata Banerjee यांच्या विरोधात कोलकात्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आणि समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील एका व्यावसायिकाने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आता एफआयआर नोंदवला आहे. संबंधित तक्रारीत, 9 मार्च 2026 रोजी आयोजित धार्मिक कार्यक्रमातील त्यांच्या भाषणातील काही विधानांवर आक्षेप घेण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या भाषणामुळे विविध समाजघटकांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असून सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भाषणातील काही वक्तव्ये आक्षेपार्ह आणि भडकाऊ स्वरूपाची असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा गुन्हा कोलकात्यातील हरे स्ट्रीट पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या कलमांखाली गुन्हा दाखल-
ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कलम 196(1) : धर्म, जात, भाषा किंवा इतर कारणांवरून वैमनस्य निर्माण करणे अथवा द्वेष पसरवणे.
कलम 351(2) : गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे.
कलम 352 : जाणीवपूर्वक चिथावणीखोर किंवा त्रासदायक कृत्य करणे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.