
Image Source:(Internet)
नागपूर : विमान इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आता नागपूर विमानतळावरील उड्डाणांवर दिसून येत आहे. वाढत्या आर्थिक भारामुळे इंदूर, दिल्ली, बंगळूरु आणि मुंबईसह काही महत्त्वाच्या मार्गांवरील विमानसेवेत कपात करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. हे बदल १५ जूनपासून लागू करण्यात येणार आहेत.
नव्या वेळापत्रकानुसार, नागपूर-इंदूर दरम्यानची नियमित दैनंदिन विमानसेवा काही काळासाठी थांबविण्यात येणार आहे. मात्र १८ जूनपासून ही सेवा पुन्हा सुरू केली जाईल. त्यानंतर आठवड्यातील मंगळवार आणि बुधवार वगळता इतर सर्व दिवशी इंदूरसाठी विमान उपलब्ध असेल.
दिल्ली मार्गावरही उड्डाणांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापूर्वी दररोज ७ ते ८ विमानसेवा उपलब्ध होत्या, मात्र आता केवळ ५ उड्डाणेच सुरू राहणार आहेत. मुंबई मार्गालाही याचा फटका बसला असून तेथेही उड्डाणांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे.
याचदरम्यान, इंडिगोकडून नवी मुंबईसाठी नवीन विमानसेवा सुरू केली जात आहे. १६ जूनपासून सुरू होणारी ही सेवा सुरुवातीला आठवड्यातील दोन दिवस — मंगळवार आणि बुधवार — उपलब्ध असेल. त्यानंतर १८ जूनपासून मंगळवार व बुधवार वगळता उर्वरित सर्व दिवशी ही सेवा प्रवाशांसाठी सुरू राहणार आहे.
विमान इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे विमान कंपन्यांना खर्च नियंत्रित करण्यासाठी उड्डाणांमध्ये कपात करावी लागत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रवाशांनी तिकीट बुकिंगपूर्वी अद्ययावत उड्डाण वेळापत्रक तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.