नागपूरच्या एमपी बसस्थानकावर ट्रॅव्हल्स बसला आग; प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली

    11-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील एमपी बसस्थानकावर गुरुवारी दुपारी उभी असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने, बसमध्ये त्यावेळी एकही प्रवासी नसल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

माहितीनुसार, दुपारी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास अमीना ट्रॅव्हल्सच्या बसमधून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीत झाले आणि बसच्या आतील भागाला आगीने वेढले. आगीची तीव्रता वाढत गेल्याने बसचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी वेगाने कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच, शेजारी उभ्या असलेल्या इतर वाहनांना सुरक्षित ठिकाणी हलवून आग पसरण्याचा धोका टाळला.

ही बस नागपूर ते मोखाड-उमरानाला मार्गावर धावणारी असून तिचा नियोजित प्रवास सायंकाळी ५.१५ वाजता सुरू होणार होता. त्यामुळे आग लागली तेव्हा बस रिकामी होती. बसमध्ये प्रवासी असते तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता आली नसती.

प्राथमिक तपासात बसच्या बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड अथवा शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही काळ बसस्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.







कॉमेडियन प्रणित मोरेसह तिघांविरुद्ध सायबर गुन्हा दाखल; आक्षेपार्ह वक्तव्यांवर कारवाई
मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्यासह आणखी दोघांविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर महिलांबाबत अवमानकारक, आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाचा मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हा संपूर्ण वाद प्रणित मोरे यांच्या लाइव्ह स्टँड-अप शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झाला. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधताना एका तरुणाने आपल्या ‘डेट’चा अनुभव सांगितला. त्यावेळी त्याने एका तरुणीसोबत जेवणासाठी गेल्यानंतर चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केल्याचे सांगत तो खर्च नंतर ‘वसूल’ करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य केले होते. या विधानावर सभागृहात हशा पिकला होता.

मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. अनेकांनी या वक्तव्याला महिलांचा अपमान करणारे आणि स्त्रीविरोधी मानसिकतेचे उदाहरण असल्याची टीका केली. महिला संघटना तसेच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संबंधित वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणादरम्यान शरीरदान केलेल्या मृतदेहांबाबत (कॅडेव्हर) अनुभव सांगताना केलेल्या एका वक्तव्यावरही वाद निर्माण झाला होता. वैद्यकीय नैतिकता आणि व्यवसायाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे हे वक्तव्य असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला होता.

या दोन्ही घटनांची दखल घेत महाराष्ट्र सायबर विभागाने संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सोशल मीडियावरील आक्षेपार्ह आशय आणि सार्वजनिक वक्तव्यांच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.