
Image Source:(Internet)
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपूरातील रेशीमबाग मुख्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे महानगरपालिकेला आलेल्या एका ई-मेलमध्ये नागपूर, पुणे आणि मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता.
धमकीचा ई-मेल बुधवारी सकाळी पुणे महापालिकेच्या अधिकृत मेल आयडीवर प्राप्त झाला. या मेलमध्ये पुणे महापौर कार्यालय, पुणे विधान भवन तसेच नागपूरातील रेशीमबाग येथील संघ मुख्यालय येथे स्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला होता. याशिवाय, नागपूर आणि पुण्यातील संघाच्या विविध शाखांनाही लक्ष्य करण्याची भाषा या मेलमध्ये वापरण्यात आली होती.
धमकीची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तातडीने हालचाल करत बॉम्ब शोधक व नाशक पथकासह रेशीमबाग परिसरात तपासणी मोहीम सुरू केली. संघ मुख्यालय, स्मृती भवन आणि हरिहर मंदिर परिसराची सखोल पाहणी करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक साहित्य आढळून आले नाही.
या घटनेनंतर नागपूर, पुणे आणि मुंबईतील संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठविण्यात आला याचा शोध सायबर विभाग घेत असून संबंधित व्यक्तीचा माग काढण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा सध्या पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.