बैल नाही म्हणून पत्नीने नांगर जुंपला अन् सरकार धावलं; लातूरच्या शेतकऱ्याची व्यथा पाहून मुख्यमंत्र्यांनी केली तात्काळ मदत!

    10-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

लातूर : जिल्ह्यातील बोंबाळी गावातील एका शेतकरी कुटुंबाचा संघर्ष सोशल मीडियामुळे थेट प्रशासनापर्यंत पोहोचला. बैलाचा मृत्यू झाल्यानंतर पेरणीची कामे थांबू नयेत म्हणून पत्नीला नांगराला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला.

काशीनाथ गायकवाड हे दिवाणी तालुक्यातील शेतमजूर आहेत. दुसऱ्यांच्या शेतात नांगरणी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, ५ जून रोजी वादळ आणि वीज कोसळल्याने त्यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नवीन बैल खरेदी करणे शक्य नव्हते.

दरम्यान, पेरणीचा हंगाम सुरू असल्याने काम थांबवणे परवडणारे नव्हते. त्यामुळे काशीनाथ यांच्या पत्नीने स्वतः नांगराला जुंपून शेतातील काम सुरू ठेवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लातूर प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले. त्यानुसार तहसीलदार आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गायकवाड कुटुंबाची भेट घेतली. प्रशासनाने तत्काळ एका बैलाची व्यवस्था करून तो शेतकऱ्याला सुपूर्द केला. याशिवाय आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात आली.

एका व्हिडिओमुळे समोर आलेला हा संघर्ष आणि त्यानंतर मिळालेली तातडीची मदत सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.