मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण तिहेरी अपघात; ट्रक चालकासह दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

    01-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी पहाटे भीषण तिहेरी अपघात घडला. तांदळाने भरलेला ट्रक, खाद्य तेलाचा कंटेनर आणि एर्टिगा कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ट्रक चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई वाहिनीवरील किलोमीटर ३६.५०० जवळ पहाटे साडेचारच्या सुमारास घडला.

प्राथमिक माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदळाच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने समोरून जाणाऱ्या खाद्य तेलाच्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. याचवेळी बाजूने जाणारी एर्टिगा कारही या अपघातात सापडली. धडक इतकी भीषण होती की ट्रक आणि कंटेनर रस्त्यावरच पलटी झाले.

या अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तर एर्टिगा कारमधील प्रवासी आणि कंटेनर चालक जखमी झाले असून त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

जखमींची नावे :

लिलाबाई सस्ते (वय ८०)
मुकिंदा सस्ते (वय ५६)
महेंद्र पाल (वय ३९)
अपघातामुळे कंटेनरमधील खाद्य तेल आणि ट्रकमधील तांदळाच्या शेकडो गोण्या महामार्गावर विखुरल्या गेल्या. परिणामी मुंबईकडे जाणाऱ्या चारही मार्गिकांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच विविध मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने खोपोली ग्रामीण रुग्णालय आणि कामोठे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यंत्रणांनी युद्धपातळीवर मदतकार्य राबवत अपघातग्रस्त वाहने आणि विखुरलेला माल हटविला. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.